कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शन आणि गोळ्यांचे दर कमी करून दर निश्चिती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, त्यांनी कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणी दर निश्तिच केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी लोकांची तारांबळ उडत आहे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेताना सर्वसामान्य जनतेचे आर्थिकदृष्ट्या हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्यसरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी एचआरसीटी चाचणीप्रमाणे, रेमडीसिवीर इंजेक्शन तसेच कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांचे दर निश्चित केल्यास त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. सध्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुटवडा भासत असल्याने ५ ते १० हजार रुपयेपर्यंत रक्कम मोजावी लागत आहे. यामध्ये ३ कंपन्या असून यांचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे. अशीच परिस्थिती औषधांच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे औषध कंपन्यांकडून उत्पादन खर्चाची माहिती घेऊन औषधांच्या दारात सवलत देण्यात यावी. त्याचबरोबर रेमडीसिवीर इंजेक्शनचा दर निश्चित करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.