कळे ( प्रतिनिधी ) संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी गोष्ट म्हणजे साहित्यिक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. असा माणूस तुमच्या सोबत आहे याचे आम्हाला विशेष कौतुक वाटते असे साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले.

पुढे बोलताना गवल म्हणाले की, आमच्या सोबत असतात म्हणून आम्हालाही खूप आनंद झाला आहे. तो आनंद व्यक्त करण्यासाठीच आम्ही तुमच्या शाळेत आलो आहे. चढत्या क्रमाने अधिक चांगल्या कादंबरीतून साहित्याची निर्मिती त्यांनी करावी.

कळे ( ता. पन्हाळा ) येथील कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कळे या प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागाकडे कार्यरत असणारे ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगान’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रशालेत डॉ. गवस आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत साहित्यिक किरण गुरव, ज्येष्ठ समीक्षक प्रोफेसर रणधीर शिंदे यांनी प्राध्यापक कृष्णात खोत यांचे अभिनंदन केले.