सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ दंतरोग तज्ञ डॉ. भगवान उमाजी देवकते यांना धनगर डेंटल असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन पुणे येथे सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील दंतरोग क्षेत्रात सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्‍याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ डॉक्टरांना हा पुरस्कार दिला जातो.

गेली ४२ वर्ष सांगोला, आटपाडी, माळशिरस, मंगळवेढा,पंढरपूर व आसपासच्या तालुक्यांमधून येणाऱ्या रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या डॉ. देवकते यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. विद्या पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ रुक्मिणी धायगुडे यांनी डॉ. देवकते यांचा जीवनपट उलगडून सांगितला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरीही अपरिमित कष्ट, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी यशाची शिखरे गाठली आणि आज ते प्रत्येक नवोदित दंतरोग तज्ञांचे आदर्श आहेत, असे त्यांनी नमूद केले. डॉ. देवकते यांनी, त्यांच्या विद्यार्थी दशेतील तसेच एक दंत रोग तज्ञ म्हणून काम करताना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांविषयी सांगितले. कामाशी एकनिष्ठ आणि समर्पण वृत्ती ठेवल्यास यश नक्कीच मिळते असा कानमंत्र त्यांनी सर्वांना दिला.

या सोहळ्यावेळी दंतरोग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, देवकते कुटुंबीय, विविध जिल्ह्यांमधून आलेले दंतरोग तज्ञ उपस्थित होते. डॉ. नागेश डोलारे, डॉ. विकास बेंदगुडे, डॉ. विजय मेहेत्रे, डॉ. दिलीप मगदूम, डॉ. रामदास हजारे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. प्रथमेश बुदे, डॉ. स्वप्नीील चोपडे, डॉ. ललित धायगुड़े यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.