कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अॅड. अशोक उपाध्ये यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी दहा हजाराची देणगी दिली आहे. त्यांच्या मातोश्री अनुसया तेजपाल उपाध्ये यांच्या शताब्दी पूर्ततेनिमित्त भगवान महावीर अध्यासनाचे डॉ. विजय ककडे यांच्याकडे ही देणगी सुपूर्द केली.

अॅड. अशोक उपाध्ये यांच्या कुटुंबीयांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचा सहभाग होता. या त्यांच्या कार्याबद्दल भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठामार्फत शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन त्यांच्या मातोश्रींचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास भगवान महावीर अध्यासन निधी संकलन अध्यक्ष व अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, भगवान महावीर अध्यासनास प्रथम एक लाखाची देणगी देणारे एन. एन. पाटील (सांगवडेकर) व त्यांच्या पत्नी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे सुरेश रोटे, एसपी वेल्थचे अनिल पाटील, विवेकानंद कॉलेजचे प्रा. संदीप पाटील, उद्योजक सुरेश जैन, अॅड. किरण महाजन, भगवान महावीर अध्यासन सल्लागार समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. या महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ती व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन भगवान महावीर अध्यासनचे डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.