मुंबई/प्रतिनिधी : मराठा आरक्षणापासून चर्चेत आलेले आणि मराठ्यांचा योद्धा म्हणून ओळख असलेले मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. पण मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. त्याचबरोबर आज मनोज जरांगे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुणीही माझे फोटो, नाव वापरू नयेत. तसेच, असे कुणी केल्यास त्याला मराठा समाजाने मदत करू नये असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की, “माझा कोणालाही पाठिंबा नाही, मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही. कोणीही माझा फोटोचा वापरू नका आणि नावही वापरू नका, तुम्ही एकाने वापरला तर बाकीचे पक्ष सुद्धा वापरतील. तुमच्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा फायदा घेऊ नका. जो जाणून-बुजून नाव घेतो किंवा फोटो वापरतोय त्यांना मराठा समाजाने मदत करू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्याची मागणी केली जात होती. यासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवारी देणार नसून, निवडणूक लढवण्यासाठी कोणताही उमेदवार जाहीर करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी निवडणुकीत आपला फोटो वापरू नका, फोटो वापरल्यास त्याला मतदान करू नका तसेच तुम्हाला ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे.

दरम्यान याचवेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, अशोक चव्हाणांची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे. “मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का? अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर घोषणा देण्याऱ्या तरुणावरती दाखल झालेल्या गुन्ह्यावर जरांगे यांनी सवाल उपस्थित केला आहे. हे मराठ्यांच्या विरोधातल षडयंत्र असून, देवेंद्र फडणवीस यांनी हे षड्यंत्र रचले आहेत. तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवर केसेस दाखल करायला लागलेत. गाडीच्या खाली उतरून तुम्हाला मारहाण केली का? मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या म्हणजे पाप आहे का?, इतका सुड देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उगवायला लागलेत, असे जरांगे म्हणाले. पण सगळं महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांसोबत असून, त्यांनी काळजी करायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांचा आता खेळ भरत आला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.