कागल (प्रतिनिधी) : शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी. अन्यथा नाईलाजाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे निवेदन भाजपच्या दिव्यांग आघाडी आणि छावा दिव्यांग सेलच्या मार्फत कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, आदिवासी, कातकरी, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, कुंभार, चांभार, विणकर, सुतार, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजंदारीवरील कामगार, हमाल, रिक्षाचालक, मालवाहतूक कामगार, हातगाडी चालवणारे, फुले-फळे विक्रेते, गारुडी तसेच कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याच्या सूचना या शासन निर्णयात केलेल्या आहेत. परंतु दिव्यांग बंधू-भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही. काही दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव पातळीवर सर्व्हे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
कोरोना संकटामुळे तालुक्यातील हजारो दिव्यांग, वृद्धांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठोस असे उत्पन्न नाही. त्यामुळे दिव्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही दिव्यांगाची शिधापत्रिका असून देखील पैशाअभावी खरेदी करता आलेली नाही. इतकी हलाखीची परिस्थिती झालेली आहे. या सगळ्याचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका आणि ३५ किलो धान्य द्यावे. तसेच त्यांची नावे दारिद्र्य रेषेखाली नोंद करून घ्यावेत. अन्यथा दिव्यांगाना नाईलाजाने त्यांच्या हक्काचे धान्य व शिधापत्रिका मिळण्यासाठी मोर्च्या व ठिय्या आंदोलन करावे लागेल, असा इशाराही आघाडीच्या वतीने आणि छावा दिव्यांग सेलच्यावतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, प्रदीप खोत, प्रतिक कदम, ललिता स्वामी, चंद्रकांत चौगुले, ओंकार संणागर, रमेश महाजन, रघुनाथ पाटील, शंकर एकशिंगे, सुजाता घुगरे, सुनंदा रानगे, सुवर्णा काशीद, मंगल देशमुख आदींच्या सह्या आहेत.