कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व कामकाज पुन्हा सोमवारी (१२ ऑक्टोंबर) पासून सुरु होणार आहे. मात्र, सकाळ ते दुपार आणि दुपार ते सायंकाळ अशा दोन सत्रामध्ये न्यायालयीन कामकाज चालणार आहे. याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज २० मार्चपासून थांबवण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून एका सत्रामध्ये हे कामकाज सुरू करण्यात आले होते. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने, न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी असे ८० हून अधिक कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे न्यायालयातील कामकाज पूर्णपणे थांबविण्यात आले होते. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज १२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावे असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहेत. सकाळी दहा ते पावणेदोन या वेळेमध्ये दिवाणी व वरिष्ठ स्तर प्रकारचे न्यायालयीन कामकाज चालणार आहे, तर दुपारी दोन ते पावणे सहा या वेळेमध्ये कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या वर्गातील कामकाज चालणार आहे. त्यामुळे वकील व नागरिकांची  प्रलंबित कामे मार्गी लागणास मदत होणार आहे.