कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक वर्षापासून महसूलमधील विविध प्रकारची कामे प्रलंबित आहेत. ती पारदर्शकपणे निर्गत करण्यासाठी महसूल लोकजत्रा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानांतर्गंत या उपक्रमाची सुरुवात २६ ऑक्टोबरला होईल. ३१ मार्च २०२१ पर्यंत उपक्रम चालेल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प!कार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले की, महसूलसंबंधीच्या प्रलंबित कामांसाठी सामान्य लोक अनेकवेळा हेलपाटे मारत असल्याचे निदर्शनास आले. अशी प्रकरणे शोधून ती निकालात काढण्यात येणार आहेत. भोगवटादार वर्ग दोन म्हणून वाटप केलेल्या शासकीय जमिनी भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे, चुकून लागलेला ब सत्ता प्रकार कमी करणे, शर्तभंगाच्या नोंदी असलेली प्रकरणे शोधणे, शासकीय कर न भरल्याने एकरीपड जमिनी मूळ मालकांच्या नावे करावयाची प्रकरणे शोधणे, सातबारा उताऱ्यावर एकूण कुटुंब प्रमुख अशी नोंद असलेली प्रकरणे शोधणे, प्रलंबित फेरफारची प्रकरणे मार्गी लावणे, स्मशानभूमी नसलेल्या गावांना स्मशानभूमी मंजूर करणे, प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या लाभक्षेत्रातील जमिनीचे वर्ग दोन शेरे कमी करणे, घराबाहेर गोठा बांधण्याचा लाभ नरेगातून देणे आदी ११६ विषयांची कामे करण्यात येणार आहेत.