दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघाने क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनी छोट्या प्रकारामध्ये संघाचा मार्गदर्शक म्हणून टीम इंडियात परत येऊ शकतो. त्यामुळे धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी काम करण्यासाठी आमंत्रण पाठवणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

आयपीएलच्या पुढच्या हंगामानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू इच्छित नाही. धोनीचे भारतीय संघासोबतचे काम वेगळ्या प्रकारचे असेल. त्याच्यावर फक्त टी-२० संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यातही त्याला निवडक खेळाडूंसोबत काम करावे लागेल.

एकंदरीत त्याचे काम डायरेक्टर ऑफ क्रिकेटसारखे असेल. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले होते. परंतु महत्त्वाचे म्हणजे, एक किंवा दोन आठवड्यात कोणत्याही मार्गदर्शकाला संघ बदलणे अवघड आहे. धोनीला कायमस्वरूपी स्थान मिळाले तर तो संघाची स्थिती नक्कीच बदलू शकतो, असा बीसीसीआयचा विश्वास आहे.