मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा आरोप  करून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. ड्रग्ज पेडलर  जयदीप राणा सध्या तुरुंगात असून  याच राणाने फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यासाठी फायनान्स हेड म्हणून काम केल्याचेही मलिक यांनी सांगितले.  

फडणवीस मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. त्यामुळे केंद्र सरकारने चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करावा. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  यांची बदली केली.  निरज गुंडे हा फडणवीस यांच्यासाठी काम करत  असल्याचा आरोप करून गुंडेच्या माध्यमातूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे, असेही मलिक  यांनी म्हटले आहे.

जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी,  फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असे आवाहनही मलिक यांनी केले. भाजपमध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केला आहे.