कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शहराच्या विकासासाठी कोल्हापूर विभागाचे नगररचना सहायक संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बैठक झाली. बैठकीत उपलब्ध जमीन वापर आराखडा, दाटीवाटीची जागा, महापुरामुळे येणार्‍या अडचणी, बांधकाम परवानाबाबत येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहर विकास आराखड्याची माहिती सभागृहाला दिली. चर्चेत प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षित जागांमुळे नागरिकांना अडचणी येतील, असे आरक्षण टाकण्यात येऊ नये. शहरात खेळासाठी क्रीडांगण, वाहन पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

जिल्हा परिषद दवाखाना व भालचंद्र थिएटर येथे पार्किंग व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत व हेरीटेज समितीच्या निर्णयावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. शहरातील दादा गवळी व सुनील संकपाळ यांच्या जमीन संपादनाबाबत प्रलंबित असलेला प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याचे माजी नगरसेवक दीपक गायकवाड यांनी सांगितले. बैठकीला, अक्षय आलासे, पप्पू पाटील, सुचितोष कडाळे, ज्ञानेश्वर पवार, सुनील माळी, नितीश कदम, योगेश गुरव आदी उपस्थित होते.