महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्री जोतिबा परिसर तसेच असंख्य शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक पन्हाळा गड आणि परिसराचे रुपडं आता पालटणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळ गडाचे जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे श्री जोतिबा मंदिर व परिसरातील विकास तसेच किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनाच्या कार्यवाहीबाबत नुकतीच बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. आमदार विनय कोरे यांनी जतन व संवर्धनाबाबत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.

बैठकीदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, आपला इतिहास अतिशय समृद्ध असून प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन वेळीच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. यामध्ये २९ गावांचा समावेश असणार आहे. यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून ही कामे पूर्ण करण्यात यावीत असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

यापूर्वी परिसराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांच्या परीपूर्ण नोंदी ठेवण्यात याव्यात. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले. प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, जेणेकरून नव्या पिढीपर्यंत आपला समृद्ध इतिहास अधिक नेमकेपणाने पोहोचवता येईल, असेही  फडणवीस यांनी सांगितले. यावेळी श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला आराखडा यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसंदर्भात आमदार विनय कोरे यांनी सूचना मांडल्या.

यावेळी आमदार कोरे म्हणाले श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला ही ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत.जोतिबा मंदिर परिसर वन्यजीव विविधतेमध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथील हरित पट्टयांचे जतन व संवर्धन केल्यास वन्यजीव अधिवासातच जपता येतील. भूमीगत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच दर्शन मंडपाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी आमदार विनय कोरे, प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेन्द्र यादव, संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.