मुंबई (प्रतिनिधी) : क्वारंटाइन असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल आज (सोमवार) पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागल्यानंतर त्यांनी स्वतःहून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही स्पष्ट झाले होते. मात्र, आज (सोमवारी) त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.