पेठवडगाव (प्रतिनिधी) : शासनाने रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या गव्हाच्या प्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांवर अन्याय झाला असून, गव्हाच्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी होत आहे.

रेशन दुकानातून प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य देण्यात येते. यामध्ये प्रति रेशनकार्ड तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जात होता; परंतु जुलै महिन्यापासून शासनाने गव्हाच्या प्रमाणात कपात केली असून, सध्या रेशन दुकानातून एक किलो गहू तर चार किलो तांदूळ देण्यात येत आहे.

रेशनकार्डवर एक किलो गहू मिळत असल्यामुळे इतक्या कमी प्रमाणात संपूर्ण कुटुंबाचे पोट भरणे अशक्य आहे. गहू मोफत मिळत असला तरी तो दळून आणण्यासाठी पैसे द्यावे लागतात बाजारामध्ये गहू महाग असल्यामुळे गोरगरिबांना बाजारातून विकत आणून गहू दळणे अशक्य आहे. त्यामुळे रेशनकार्डवर पूर्ववत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.