कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील युवक-युवतींनी करिअर व जीवनमान उज्ज्वल होण्यासाठी दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनेचा (डीडीयू-जीकेवाय) लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना पूर्णपणे निःशुल्क असून, कोणत्याही प्रकारची फी विद्यार्थ्यांना आकारली जात नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहे.

‘डीडीयू-जीकेवाय’ योजना ही ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के यांच्या योगदानातून चालवली जाते. ही योजना १०० टक्के रोजगार पूरक असून, या योजनेत रहिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम अवलंबला जातो. या रहिवाशी प्रशिक्षण आभ्यासक्रमामध्ये थेअरी ३० टक्के असते आणि प्रशिक्षण हे ७० टक्के असते या अभ्यासक्रमात प्रशिक्षणावरच जास्त भर दिला जातो. ३ महिन्यांच्या अल्पशा कालावधीतही चांगले कुशल कारागीर तयार होतात.

‘डीडीयू-जीकेवाय’ ही योजनेत सरकारी नियमानुसार नियोजित सेंटरमध्ये ३ महिन्यांचे रहिवासी प्रशिक्षण दिले जाते. या ३ महिन्यांतील २ महिने हे सेंटरमध्ये प्रशिक्षण असते आणि यातील एक महिना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी नियोजित कंपनी अथवा फर्ममध्ये पाठवले जाते. एक महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच कंपनीमध्ये मुलाखत घेऊन कामावर कायम केले जाते.

पुढील कमीत कमी ३ महिने जॉब करावा लागतो. या ३ महिन्यांमध्ये सेंटरकडून १ ते १० तारखेमध्ये पोस्ट पेमेंट सपोर्ट म्हणजे कंपनीचा महिन्याचा पगार होईपर्यंत १००० रुपयांचे मानधन सलग ३ महिने दिले जाते. सेंटरमधील ३ महिन्यांच्या प्रशिक्षण काळात सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण दिले जाते. २ गणवेश दिले जातात. अभ्यासासाठी कॉम्प्युटर, मोबाईल टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो. कॉम्प्युटर व व्यवहारातील इंग्रजी बोलणे शिकवले जाते.