मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बुधवारी आला. या निर्णयाने एकनाथ शिंदे गटात नवसंजीवनी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करताना कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे.

पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्यामागचा आधार घेत या निर्णय घेतल्याचं नमूद केले. आता 16 जानेवारीपासून राष्ट्रवादीतील फुटीबाबत सुनावणी होणार आहे. याबाबत 31 तारखेपर्यंत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिवसेनेबाबतच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही टेन्शन आले आहे.

याचे कारण म्हणजे ज्या आधारावर शिवसेनेवर खरी सत्ता एकनाथ शिंदे गटाची असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्याकडे पाहता अजित पवारांना राष्ट्रवादीत धार मिळू शकते. यामुळे शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या वक्तव्यांवरूनही ते धास्तावले असल्याचे दिसून येते. शिंदे गटाच्या आमदारांची भाषा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार नसल्याचे संकेत देत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांना पक्षाच्या भवितव्याची भीती वाटत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय अजित पवारांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे 54 पैकी 40 आमदार असल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला आहे. एवढेच नाही तर आगामी काळात आणखी काही आमदार पक्ष बदलू शकतात, अशी चर्चा आहे.