कोल्हापूर (प्रतिनिधी) : नियती क्रूर असते असे म्हणतात. तसाच प्रकार करवीर तालुक्यातील म्हारुळ येथील पाच वर्षांच्या ‘यश’ च्या बाबतीत घडला. आज (शुक्रवार) वाढदिवसा दिवशीच त्याच्यावर नियतीने झडप घातली. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याच्यावर उपचार करण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
म्हारुळ येथील चंद्रकांत कवडीक हे सेंटरिंग आणि शेतीचे काम करतात. यश हा त्यांचा मुलगा आहे. पंधरा दिवसापूर्वी आई आणि बाबांबरोबर तो दुपारच्यावेळी शेताकडे जात असताना अचानक तो खाली कोसळला. त्याने डोळे पांढरे केले, तोंडाला फेस आला. उलटीही केली. अचानक हा प्रकार घडल्याने आई वडील भांबावून गेले. त्यांनी ‘यश’ ला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर काही दिवस उपचार घेऊनही प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यामुळे आई- वडिलांनी दुसऱ्या दवाखान्यात हलवले. तिथेही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, यश उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. उपचारासाठी परिस्थिती नसताना यशला वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी काल (गुरुवार) त्याला घरी घेऊन जायला सांगितले. नाईलाजाने त्याला घरी आणले. घरच्यांनी नियती आणि दैवावर विश्वास ठेवून त्याला घरी आणले. काही तरी चमत्कार होईल आणि यश बरा होईल, अशी भाबडी आशा आई- वडिलांना वाटत होती. पण, आज सकाळी क्रूर नियतीने डाव साधला. यशची प्राणज्योत मालवली.
आज यशचा वाढदिवस होता. तो आजारी पडेल आणि तो जाईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. वडिलांनी आज त्याचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून केक, ड्रेस, गाडी, चप्पल आणले होते. लाडक्या आजीने चांदीचे कडे करून आणले होते. पण, वाढदिवस साजरा करायला ‘यश’ च नव्हता. त्याच्यासाठी आणलेल्या सर्व वस्तूंसह त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. क्रूर नियतीने सर्वानाच पराभूत केले. त्यामुळे यशच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.