मुंबई (प्रतिनिधी) : सन २०२४ सालची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवून दाखवावी. मग कुणाला जास्त जागा मिळतात ते पाहू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.
सन २०२२ साली पुणे मनपाच्या निवडणुकीत पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत, हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे वक्तव्य मिटकरी यांनी केले होते. याचा पाटील यांनी समाचार घेतला.
चंद्रकांतदादा म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार भारतीय संस्कृतीला साजेसा नाही. दगा देऊन काहीही होऊ शकते. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात उतरुन योग्यप्रकारे लढा. २०२२ कशाला २०२४ च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात ते पाहू असे जाहीर आव्हान दिले.