कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात. आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा. पुढील तीन वर्षात डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला इंजिनिअर आणि जबाबदार व्यक्ती बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, असा विश्वास डी. वाय. ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिला. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

डी. वाय. पाटील हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शैक्षणिक ग्रुप असून, जगभरात सुमारे १८२ शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. विद्यार्थांच्या प्रगतीसाठी लागणारे सर्व सहकार्य हे डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही डॉ. गुप्ता यांनी दिली. प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या माध्यमातून आम्ही अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थांच्या कलागुणांना वाव दिला जातो. अनेक नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात.

यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पालक सुरेश देसाई, तेजस्विनी वरुटे, तसेच विद्यार्थिनी आर्या पाटील, वैष्णवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य एम. पी. पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. बी. जी. शिंदे, असिस्टंट रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे, प्रा. महेश रेनके, प्रा. अक्षय करपे, प्रा.नितीन माळी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.