गगनबावडा (प्रतिनिधी) : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍यास गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी राज्यस्तरीय ‘कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने कारखान्यास गौरवण्यात आले. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय डी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

डी. वाय. पाटील साखर कारखान्याने साखर कारखाना व आसवणी प्रकल्पात चांगली प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पाण्याचे सुव्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर व सांडपाणी उत्सर्जन कमी आहे. पर्यावरण व्यवस्थापनासाठी सक्षम, प्रशिक्षित व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून कारखान्यात औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावीपणे सुरु आहे. कार्यक्षेत्रात सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी व पीक फेरपालटासाठी कारखान्याने नियोजन केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन दिले जात असून, कारखान्याच्या सभोवताली चांगल्या प्रकारचा हरितपट्टा विकसित केलेला आहे. त्यामुळे कारखान्यास हा पुरस्कार मिळाला असून, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कारासंबंधी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, “गगनबावड्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागात प्रतिकूल परिस्थितीत असताना कारखाना उभारणी करुन तो समर्थपणे व पर्यावरणपूरक चालवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा व उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे दोनवेळा असे आतापर्यंत चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या कार्यकुशल कामगारांच्या कामाची पोहोच पावती आहे.”

पुरस्कार वितरणप्रसंगी व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, तेजस सतेज पाटील, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, बजरंग पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत खानविलकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, संजय पडवळ, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, प्रभाकर तावडे, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, पर्यावरण अधिकारी अमर भांबुरे व खातेप्रमुख  उपस्थित होते.