कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च हेरिटेज संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे कार्य व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) अर्थात ‘इंटॅक’ ची स्थापना १९८४ मध्ये नवी दिल्ली येथे झाली. ही भारतातील प्रमुख हेरिटेज संस्था आहे. टँजिबल, इण्टेनजिबल, नॅचरल आर्ट आणि मटेरियल असे अनेकविध पैलू असलेल्या हेरिटेजना प्रोत्साहन देणे, त्याबाबतची जागरूकता निर्माण करणे या प्रमुख हेतूने ही संस्था कार्यरत आहे.

सांस्कृतिक, नैसर्गिक संसाधने व वारसास्थळे यासाठी आर्थिक, तांत्रिक व बौद्धिक साहाय्य उपलब्ध करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वारसास्थळे आर्किटेक्चरल वारसास्थळे, कला, अमूर्त सांस्कृतिक वारसा, हेरिटेज पर्यटन माहिती केंद्र असे अनेक उपक्रम या संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.