पंढरपूर (प्रतिनिधी) : अनलॉक-५ अंतर्गत राज्यात विविध व्यवसाय, उद्योग, चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मागील आठवड्यात मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मुभा देण्यात आली. मात्र पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे आता कार्तिकी एकादशी यात्रा काळात पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीप्रमाणे संचारबंदी लागू होणार आहे. त्याचप्रमाणे चार दिवस एसटी बससेवा बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रात्री बारापासून २६ नोव्हेंबर रात्री बारापर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होणार असून २५ नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. जे भाविक अथवा दिंड्या पंढरपूरच्या वाटेकडे निघाल्या आहेत त्यांनी परत जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच या दिंड्या व भाविकांना परत पाठविण्यात येणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत पोहचू नये यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेकेटिंग केले जाणार आहे. वारकरी संप्रदाय मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी करीत असला तरी कोरोनाचा वाढता धोका पाहून शासन व प्रशासनाची धोका पत्करण्याची तयारी नाही.