कोल्हापूर (प्रतिनिधी) : घोडावत विद्यापीठात चारशे बेडचे जंबो सेंटर आहे. तिथले वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने आणि त्यांचे सहकारी गेली चार महिने घरीसुद्धा न जाता अविरत सेवा देत आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या-ज्यावेळी रुग्णांसाठी सीपीआर संपर्क साधला परंतु तिथे १२२ डॉक्टर असूनही तिथला अनुभव काही चांगला आला नाही. त्यामुळे सीपीआरला दुरुस्त करण्याची नितांत गरज आहे. असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवले.
कागलमध्ये डी आर माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी खुद्द मंत्रीमहोदयांनीच यावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने सीपीआरमध्ये आरोग्यसेवा या काळात कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे काही खाजगी दवाखान्यांनी चालविलेली रुग्णांची लुट हा मुद्दा गाजत असताना आता सिपिआरच्या कारभारावरही एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्या ज्या वेळी देशासह महाराष्ट्रात कोणत्याही रूपात आपत्ती आली. त्यावेळी शरद पवार ती निवारण्यासाठी धावून गेले आहेत. कोवीड या महामारीत ही शरद पवार जनतेला दिलासा देण्यासाठी आणि कोरोना योद्ध्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले आहेत. त्यामुळे श्री. पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.