कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गोकुळने प्रतिदिनी 20 लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने 17 लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.

गेल्या चार महिन्यापासून राज्यातील गाय दूध खरेदी दारामध्ये सतत घसरण सुरु असून शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर रुपये 5 इतके अनुदान जाहीर केले असले तरी गोकुळकडून सध्या देण्यात येणाऱ्या गाय दूध खरेदी दरामध्ये कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सध्या शासनाने दि.11/01/2024 ते 10/02/2024 या कालावधीत गाय दूध पुरवठा करणाऱ्या राज्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

थोडक्यात गोकुळचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर 33 रुपये व शासनाकडून मिळणारे 5 रुपये अनुदान असा एकूण 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. करिता प्रतिलिटर 38 रुपये इतका उच्चांकी दर दि.11/01/2024 ते 10/02/2024 या कालावधीत गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना मिळणार असून हा राज्यातील उच्चांकी दर असल्याचं ते म्हणाले.