कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका कारवाईमध्ये सहआरोपी न करण्यासाठी ४० हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मटका कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या एकाला आरोपी न करण्यासाठी त्याच्याकडून ४० हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार या दोघांना सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.