दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. यातच आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून रविवारी करण्यात आला. मात्र तिहार जेल प्रशासनाचं वेगळंच काहीतरी म्हणणं समोर येत आहे. तर मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आप नेते सौरभ भारद्वाज पत्रकारांशी बोलताना केली होती.

दरम्यान, पक्षाच्या नेत्या आणि आप सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे १२ ते १७ एप्रिल या दिवसांतील रिडिंगस सर्वांसमोर मांडले. या स्थितीत इन्सुलिन न घेतल्यास हळूहळू माणसाचे अवयव निकामी होऊ लागतात. सरकारचे असे वागणे निर्दयी आहे, असा आरोप आतिशी यांनी केला. न्यायालयीन कोठडी देताना कोर्टाने केजरीवाल यांना रोज शुगर लेवल तपासणे तसेच तुरुंगात ग्लुकोमीटर नेण्याची परवानगी दिली होती, याकडेही आपने सर्वांचे लक्ष वेधले.

यावर तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एम्सच्या सीनियर डायबिटॉलॉजिस्टच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कन्सल्टेशन दिलं गेलं. तब्बल ४० मिनिटं कन्सल्टेशननंतर डॉक्टरांकडून केजरीवालांना कुठलीही काळजीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं. त्यांना ठाराविक औषधं सुरु ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असून जेल प्रशासन नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. अशी माहिती एका वृत्त वाहिनीने दिली आहे.

तर सुनीता केजरीवाल यांच्या मागणीनंतर तिहार जेल प्रशासनाने व्हीसीच्या माध्यमातून केजरीवालांना डॉक्टरांकडून कन्सल्टेशन दिलं. एम्सचे सीनियर डायबिटीज स्पेशालिस्टसह आरएमओ तिहार आणि एमओ तिहार हेसुद्धा व्हीसीच्या वेळी उपस्थित होते. डॉक्टरांनी ग्लुकोज मॉनिटरिंग सेन्सरचं पूर्ण रेकॉर्ड आणि केजरीवालांचं जेवण आणि औषधांचा पूर्ण तपशील जाणून घेतला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी इन्सुलिनच्या मुद्द्यावर काहीच भाष्य केलं नाही. शिवाय डॉक्टरांनीही तसा सल्ला दिला नाही.

इन्सुलिन का दिलं जात नाही- आप
तिहार जेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपच्या सूत्रांनी सांगितलं की, तिहार जेल प्रशासनाने मान्य केलंय की २० दिवस केजरीवालांना डायबिटीच स्पेशालिस्टकडे दाखवलं नाही. जाणूनबुजून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांची शुगर लेव्हर ३०० आहे, तरी त्यांना इन्सुलिन का दिलं जात नाही?

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर आरोप केले होते. केंद्र सरकार अरविंद केजरीवालांची हत्या करण्याचा कट रचत आहे, असा आरोप त्यांनी लावला होता.