नांदेड (प्रतिनिधी) : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी ४१ हजार ९३३ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.  

पहिल्या फेरीपासूनच जितेश अंतापूरकर आघाडीवर होते. शेवटच्या फेरीअखेर अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ८४० मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ९०७ मते मिळाली. वंचितचे उमेदवार उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते पडली.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे देगलूरमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यासाठी ३० ऑक्टोबररोजी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. पण मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती.