पन्हाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे त्याला मिळणारा नाही ही परिस्थिती आहे. सध्या सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.
शासनाकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत त्याला अदयाप मिळाली नाही. हवालदिल परिस्थितीमध्ये रब्बीच्या पेरण्यांसाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल उपलब्ध नाही. अशा नैसर्गिक संकटकाळात प्रशासनाकडून शेतकऱ्याला विना विलंब प्रत्येक एकरी २५,००० आर्थिक मदत शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वर जमा करण्यात यावी, तसेच राज्यभर सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलने लक्षात घेता गायीच्या प्रति लिटर दुधास ३० रुपये भाव शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी शिवशंभू शेतकरी आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार विनय कवलवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
येत्या १० दिवसात प्रशासनाकडून मागणीची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा शिवशंभू शेतकरी आघाडी संघटनेकडून येत्या ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येईल, अशी घोषणा संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष योगेश कावळे यांनी केली. यावेळी संपत खाके अविनाश केकरे उपस्थित होते.