कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदानित व स्वयंसेवी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मागोवा घेण्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांशी ‘संवाद’ साधण्यात आला, अशी माहिती जि.प. चे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

वसतिगृहातील सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आणि अडचणींचा मागवा घेण्यासाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून, त्यानुसार जिल्ह्यातील ४६ अनुदानित वसतिगृहांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी, दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सर्व तपासणी अधिकारी यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यासोबत रात्रीचे जेवण करून मुक्काम केला. विद्यार्थ्यांची दिनचर्या समजून घेतली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याबाबत विद्यार्थ्याशी चर्चा केली.

तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणीवा किंवा चांगल्या बाबीसंदर्भात तपासणी अधिकारी व अधीक्षक यांची दि. २३ ऑगस्ट रोजी एकत्रित चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.