कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि  उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना केल्या. तसेच शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव, जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे लवकर दुरुस्त केले जातील, अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांनी  यावेळी दिली.

तर पाचगाव, मोरेवाडी कळंबा या परिसरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम हे कळंबा या ठिकाणी करण्यात आले आहे. या ठिकाणचं लाईट बिल अधिक असून पोलिस प्रशासनाने ते अदा करावे, अशी विनंती पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी केली.

जिल्हा पोलिस प्रमुख बलकवडे यांनी, ज्या परिसरात चोऱ्या झाल्या आहेत त्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कळंबा सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधील वीज बिल मिटर हे पोलिस प्रशासनाच्या नावावर घेवून वीज  बिल अदा केले जाईल. तसेच ३० लाख रुपये खर्च करून गांधीनगर परिसरात सुद्धा सीसीटीव्हीचे १८२ कॅमेरे बसवले जाणार आहेत. सानेगुरुजी वसाहत ,संभाजीनगर या ठिकाणी नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो शासनाला पाठवला जाणार आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिष्टमंडळाला सांगितले.

यावेळी मोरेवाडी सरपंच रूपाली बाजारी, पाचगाव उपसरपंच स्नेहल शिंदे, सुदर्शन पाटील, प्रशांत देसाई, अभिजीत भोसले, संग्राम पोवाळकर,  सुनील शिंदे, नारायण गाडगीळ उपस्थित होते.