मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात परतीच्या पावसानंतर आता थंडीची चाहूल सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हुडहुडी भरली आहे. पुणे, सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळते. मुंबई-नवी मुंबई या भागांतही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. यामुळे एकीकडे पावसाचा अंदाज असताना दुसरीकडे राज्यात थंडीही वाढत आहे.

रविवारी पुण्यामध्ये १२.७ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी तापमानाचा हाच आकडा निफाडमध्ये ११.८ वर पोहोचला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही थंडीला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरमध्ये थंडी वाढेल असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातल्या सर्वात महत्त्वाच्या भागात म्हणजे महाबळेश्वरमध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. महाबळेश्वर इथेही किमान तापमान १३ अंशापर्यंत पोहोचले आहे. सध्याचे हवामान पाहता येथे पर्यटनाच्या दृष्टीने वाई, पाचगणी, भिलार, भोसे इथे  पर्यटकांची संख्याही वाढ वाढली आहे.