मुंबई (प्रतिनिधी) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मोठं यश मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेट डीआरआयने उद्धवस्त केलं असून इथियोपीयामधून भारतात तस्करी करण्यात येत असलेलं 100 कोटींचं कोकेन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं आहे.

या कारवाईत डीआरआयने 9.829 किलो कोकेन जप्त केलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये डीआरआयने 2 महिला प्रवाशांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला इंडोनेशियाची आणि दुसरी थायलंडची आहे. या दोघीही इथियोपीयामधून अदिस अबाबमधून भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डीआरआयने केलेल्या तपासामध्ये सदर अमली पदार्थ हे नवी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये वितरित करण्याचा प्लॅन होता. मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेल्या डीआरआयच्या टीमला मोठ्याप्रमाणात अमली पदार्थांची मुंबईतून दिल्लीला तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार एका टीमला दिल्लीमध्ये अलर्ट करण्यात आलं. एकीकडे मुंबईमध्ये या दोन महिलांविरोधात कारवाई करताना या रॅकेटमधील दिल्लीतील सूत्रधार ताब्यात घेण्यासाठी ही टीम पाठवण्यात आली आहे.