मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील बंद मंदिरावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवणही करून दिली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे राज्यपालांना सुनावले. 

बार, रेस्टॉरंट सुरू झाले,  देवच कुलूपबंद का ? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला का ? मंदिरे सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का, असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत. याला उत्तर देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपरोधिक शब्दात राज्यपालांचा समाचार घेतला. ते म्हणतात, मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्याचे हसत-खेळत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल.