मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांसाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ही मदत खरडून गेलेल्या शेती आणि शेतीच्या नुकसानीसाठी असणार आहे. दिवाळीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोच करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्राकडून किती पैसे येणं बाकी आहे याची माहिती घेत आहेत. नुकसानभरपाई अधिकाधिक २ हेक्टरपर्यंत दिली जाईल. फळबाग क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये, पाणीपुरवठ्यासाठी १ हजार कोटी, रस्ते आणि पुलाच्या बांधणी, दुरुस्तीसाठी २ हजार ६३५ कोटींची मदत दिली जाईल.