कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची साफसफाई करण्यात येत आहे.
आज पहिल्या दिवशी नित्य वापरातील चांदीच्या वस्तूंची, दुसऱ्या दिवशी देवीचे जडावाचे सुवर्ण अलंकार व सोन्याची पालखीची स्वच्छता केली जाते. तर तिसऱ्या दिवशी हिरे, माणिक जडवलेल्या अलंकारांची स्वच्छता केली जाते. देवीच्या दागिन्यांमध्ये चंद्रहार ,शिवकालीन कवड्याची माळ, रत्नजडित किरीट, मंगलसुत्र, हिर्याची नथ, मोहरांची माळ श्रीयंत्र हार, जडावाची मयूर कुंडले यासह विविध अलंकारिक दागिन्यांचा समावेश आहे. तर गरुड मंडपात असलेल्या सुवर्ण पालखीची सुद्धा स्वच्छता करून त्याला चकाकी देण्यात आली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईचा नवरात्र उत्सव भक्ताविंना होणार असून सर्व धार्मिक कार्यक्रम मात्र होणार आहेत.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव उपस्थित होते.