मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्या (बुधवार) पासून सुरुवात होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

यामध्ये 8,21,450 विद्यार्थी आणि 6,92,424 विद्यार्थीनी आहेत. एकूण 100,497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.

तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी 2.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धतीते प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून या विषयासाठी 1,94,439 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरसाठी परवानगी, मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात नसू नये. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असं आव्हान शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केलं आहे.