मुंबई/प्रतिनिधी : नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद सुरु आहे. शिवसेना शिंदे गट नाशिकची जागा मिळावी यासाठी आग्रही आहे. पण ही जागा अजित पवार गटाला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. यातच आता भुजबळ यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा प्रस्ताव असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पण भुजबळ यंनी यावर भाष्य करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “ही चुकीची बातमी आहे. अतिशय चुकीची बातमी आहे. त्याला कशाचाही आधार नाही. पण, एवढंच सांगतो की, या ठिकाणी अजित पवारांनी ही जागा मागितली. अजित पवार, प्रफुल पटेल यांचं म्हणणं असं आहे की, वरून सांगण्यात आलं की, ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि तर घ्या. परंतु छगन भुजबळांनाच इथं उभं करा. असं त्यांनी मला सांगितलं. यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. चिन्हाबद्दल माझ्याकडे कुणीही विचारणा केलेली नाही”, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

काय म्हणाले भुजबळ ?
कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार ही बातमी चुकीची आणि निराधार आहे. अजित पवारांनी ही जागा मागितली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की नाशिकची जागा हवी असेल तर घ्या पण छगन भुजबळांना उमेदवारी द्या. या पलिकडे मी फार काही सांगू शकत नाही. त्यामागे काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील. माझ्याकडे कुणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, चर्चा केली नाही काहीही घडलेलं नाही.