धामोड  (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ कोरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या सुचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून राधानगरी तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार बेमुदत संप करणार आहेत.

सध्या राज्यात  ५५  हजार परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार  आहेत. त्यांनी कोविड  महामारीच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच  नसताना काम केले आहे.  कोरोनामुळे आजपर्यंत म्रुत्युमूखी पडलेल्या  परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत झालेली नाही.  तरीही  राज्यात भूकबळी होऊ नये, म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता  दुकानदार धान्य वाटप करत आहेत.

संघटनेने शासनास विविध मागण्यांचे निवेदन देऊनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. तरी सर्व परवानाधारकांना ५० लाखांचे विमाकवच मिळावे,  पोत्याचे वजन वजा करून  ५०  किलो  धान्य द्यावे,   सध्या असलेले ई पास मशीन बदलून ४ जी कनेक्शन जोडण्यात यावे,  शिधा पत्रिकाधारकांचा थम न घेता दुकानदारांच्या थम वाटपास परवानगी द्यावी. या मागण्यांचे निवेदन तालुका अध्यक्ष महेश निल्ले यांच्या अध्यक्षतेखाली  शिष्टमंडळाने राधानगरी तहसीलदार यांना दिल्याची माहिती केळोशी बुद्रुक येथील एस. एल. पाटील, धान्य दुकानदार संजय पाटील यांनी दिली.