मुंबई – माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले . आता शरद पवारांच्या बाहेरच्या पवार वक्त्यव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा शरद पवारांवर सोशल मीडियावर निशाणा साधला आहे. शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, याची आधी माहिती घ्यावी.. असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे..?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले , राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत. पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात, त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, अशी टीका बावनकुळे यांनी केली.आता यावर माजी कृषिमंत्री शरद पवार काय सडेत्तोर उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.