कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मनोरुग्णासारखी झाली असल्याची घणाघाती टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, अशी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान ते कोल्हापुरात बोलत होते.

ते म्हणाले, चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे, खुळ्यासारखे बडबडत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून ते असे करत आहेत. भाजप सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांना दोन नंबरचे स्थान होते. शिवाय बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे खाते सुद्धा होते. मात्र, त्यांनी त्याकाळात रस्त्यांची अक्षरशः वाट लावून टाकली. मला जर बांधकाम खाते मिळाले असते तर मी काचेचे रस्ते केले असते.