पुणे ( प्रतिनिधी ) आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थित होते. यावेळी ना. पाटील यांनी, समाजातील व्यक्तींनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे, असे आवाहन केले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या स्मारकाच्या रूपाने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक पुण्यात असावे ही 20 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल.

स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावे. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी यानिमित्त केले.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ,  सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,  विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.