नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे नुकसान सोसावे लागलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांना ४३८१.८८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्किम या राज्यांचाही समावेश आहे. यावर्षी चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत ६ राज्यांना अतिरिक्त केंद्रीय साहाय्य मंजूर केले आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पश्चिम बंगालला  २७०७.७७ कोटी, ओडिशाला १२८.२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चक्रीवादळ निसर्गमुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्राला २६८.५९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

कर्नाटकमध्ये पूर आणि दरड कोसळून झालेल्या नुकसानीसाठी ५७७.८४ कोटी रुपये, मध्य प्रदेशला ६११.६१ कोटी रुपये आणि सिक्कीमला ८७.८४ कोटी रुपये दिले जातील.