चंदीगढ (वृत्तसंस्था) : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसच्या सदस्यपदाचा  राजीनामा देऊन आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे आपल्या नव्या पक्षाचे नामांतर केले आहे.

अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या  पत्रात नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, तुमच्या (सोनिया गांधी) आणि तुमच्या मुलांच्या (राहुल-प्रियांका गांधी) वर्तनामुळे मी खूप खोलवर दुखावलो गेलो आहे. जेवढं प्रेम मी माझ्या मुलांवर करतो, तेवढंच प्रेम मी त्यांच्यावर देखील करतो. त्यांच्या वडिलांना मी १९५४ सालापासून ओळखत होतो. आम्ही शाळेत एकत्र होतो.

दरम्यान, पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी मतभेद टोकाला गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.  अखेर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.