कोल्हापूर (प्रतिनिधी) : कमी उत्पन्न प्राप्त होत असलेल्या मुडशिंगी आणि चुये-येवती या मार्गावरील बस सेवा दि. १३ सप्टेंबरपासून बंद करण्यात येत आहे, याची या मार्गावरील सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केएमटी प्रशासनाने केले आहे.

केएमटी उपक्रमाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी प्राधान्याने देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ज्या मार्गावर कमी उत्पन्न प्राप्त होत आहे, अशा मार्गावरील बस सेवा टप्प्याटप्प्याने बंद कराव्या लागणार आहेत. कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बस सेवा बंद करण्याबाबत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची मागणी होत होती.

यापूर्वी कुडित्रे, म्हारुळ व बहिरेश्वर या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त मुडशिंगी व चुये-येवती या मार्गावरील बस सेवेपासून अपेक्षित उत्पन्नापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न प्राप्त होत असल्याने मुडशिंगी व चुये-येवती या मार्गावरील बस सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करुन भविष्यात आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास हा मार्ग चालू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल,असे केएमटी प्रशासनाने म्हटले आहे.