नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना शुक्रवारी ईडीने ताब्यात घेतले आहे. के. कविता यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी दोन्ही तपास यंत्रणांनी छापेमारी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. आज दुपारी दिल्लीहून १० अधिकारी चौकशीसाठी हैदराबादमध्ये आले होते. के. कविता आणि त्यांचे पती डी. अनिल कुमार यांच्या समोरच घराची झडती घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित ही चौकशी करण्यात येत आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात के. कविता यांचेही नाव गुंतले होते. यावेळी ईडी टीमसोबत आयकर अधिकारीही उपस्थित होते.  ईडीच्या टीमसोबत मोठ्या संख्येने पोलिसही होते.

ईडीच्या या छाप्यापूर्वी कविता तपास यंत्रणेच्या अनेक समन्सवर हजर झाल्या नव्हत्या. यापूर्वी, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणासंदर्भात ईडीने कविता यांचीही चौकशी केली होती. ईडीने दावा केला होता की कविता मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबी ‘साउथ ग्रुप’शी जोडल्या गेल्या आहेत. 2021-22 च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होत्या.

‘आप’चे संपर्क प्रमुख विजय नायर यांच्याशी असलेल्या कथित संबंधांप्रकरणी ईडीने कविता यांना गेल्यावर्षी पहिल्यांदा समन्स बजावले होते. कविता नायरच्या सतत संपर्कात होत्या, असा आरोप होत आहे. धोरणे तयार करताना आणि अंमलबजावणी करताना विजय नायर मद्य उद्योग व्यावसायिक आणि राजकारण्यांशी संबंधित होते. दिल्लीच्या मद्य धोरणात कथित घोटाळ्याच्या आरोपावरून विजय नायरला तपास यंत्रणेने अटक केली होती.