मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7. 30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मतदानाचा वेग मंदावलेला दिसत आहे. तर काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर येत आहे.

राज्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्यातील नेत्यांनी प्रचारसभेदरम्यान मतदारांना केले होते. परंतू, आज मतदानाच्या दिवशी चक्क मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, अमरावतीमधील मेळघाटात 6 गावांतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच, परभणी लोकसभा मतदारसंघातील बलसा खुर्द या गावामध्ये मतदानावर मतदारांनी बहिष्कार घातला आहे. जवळपास 1295 मतदान असलेल्या या केंद्रावर मतदान सुरू झाल्यापासून एकाही नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला नाही. या मागचं कारण म्हणजे अतिक्रमण. कारण काही वर्षांपूर्वी बलसा गावात प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आले होते. गावातील अतिक्रमण विरोधात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही काही कारवाई होत नव्हती. परिणामी अतिक्रमणाच्या नाराजीतून बलसा गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे समजते.
नेमकं प्रकरण काय?
परभणीच्या बसला खुर्द गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर काही समाजकंटकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिमक्रम हटवण्याची आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी करत होतो. पण अतिक्रमण हटवले नाही. उच्च न्यायालयाचा निकालही ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे. मात्र तरीही अतिक्रमण हटवले जात नाही. या अतिक्रमाणाचा आमच्या गावाला प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पण न्याय मिळत नासल्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याता निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.