पुणे (प्रतिनिधी) : दुर्धर आजाराशी लढा देणारे चिंचवड येथील लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या मुक्ता टिळक हे दोन्ही भाजपचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीतही मतदान करणार आहेत.

तब्बल ५० दिवस दुर्धर आजाराशी लढून नुकतेच घरी परतलेले आ. लक्ष्मण जगताप हे राज्यसभा निवडणुकीत डॉक्टरांनी सूचना करूनही पक्षासाठी मतदानाला रुग्णवाहिकेतून मुंबईला गेले होते. शनिवारी भाजपच्या बैठकीतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन करून ‘लक्ष्मणभाऊ राज्यसभेला तुम्ही फार मोठी कामगिरी बजावली आहे. प्रकृती महत्वाची आहे, तुम्ही विश्रांती घ्या,’ असे समजावून सांगितले; मात्र त्यास नकार देत ‘मी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला येणारच’ असे आमदार जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, सोमवारी (२० जून) सकाळी ७ वाजता आमदार लक्ष्मण जगताप हे त्यांच्या निवासस्थानाहून, तर आमदार मुक्ता टिळक या केसरीवाड्यातून साडेसहा वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे पुणे शहराचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांची प्रकृती सध्या ठीक नाही. ते सध्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या दोघांनाही मतदानासाठी आले नाही तर चालेल. तुमची प्रकृती महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी, असा सल्ला मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीतून फडणवीस यांनी दिला; मात्र त्यास नकार देत जगताप आणि टिळक यांनी मतदानाला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.