कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान ‘लाईव्ह मराठी’ने अमल महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त सर्वात आधी प्रसारित केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.    

मागील काही दिवसांपासून भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून खल सुरू होता. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माजी आ. सुरेश हळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु ना. पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी महाडिक कुटुंबातच उमेदवारी देण्याबाबत पक्षातून जोर धरू लागला होता. अखेर अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

दरम्यान, अमल महाडिक यांना उमेदवारी मिळाल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात पाटील विरूद्ध महाडिक असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची आणि रंगदार होणार आहे. ना. पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत यंत्रणा गतिमान केली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खा. धनंजय महाडिक यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे.