मुंबई (प्रतिनिधी) : कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केली. त्यानंतर राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भाजपने केला होता. यावर मंत्री शिंगणे यांनी उत्तर दिले  आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे  रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. त्यातच ब्रुक फार्मा कंपनीने रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यावरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. यावरून राजकीय आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहे.