कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षत्यागाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाटील यांनी आज (गुरुवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, खडसे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल, असा निर्णय ते घेणार नाहीत.
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांचे कृषीमंत्री पद निश्चित झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यावरूनच पाटील यांना यासंबंधी छेडले असता ते म्हणाले की, ते खडसे राष्ट्रवादीत येणार, कृषी मंत्री होणार असा दावा करणाऱ्यांनाच खडसेंच्या राजकीय भूमिकेबद्दल तुम्ही माहिती विचारावी. खडसे पक्षात बापाच्या भूमिकेत आहेत. या अर्थानेच मी आमचं काय चुकलं असेल तर बंद खोलीत थोबाडीत मारा, असे म्हटलं होतं. वारंवार माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केल्याने पक्षाचे नुकसान होते. म्हणून ते पक्षाचे नुकसान होईल, असा काही निर्णय घेणार नाहीत.